कौशांबी : अलाहाबादजवळ वायुदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे, कौशांबी जिल्ह्यात ‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळलं. इंजीनमधील बिघाडामुळे उड्डाण घेताच काही वेळात हेलिकॉप्टर कोसळलं. ही घटना अलाहाबाद-कौशांबी सीमेवर दुर्घटना घडली. सर्वात सुखद बाब म्हणजे हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुखरुप बाहेर निघाले.
वायुदलाचं चेतक हेलिकॉप्टर बमरौलीहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड झाला, तातडीने हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी प्रयत्न सुरू होते, मात्र, लँडिंगआधीच थोडक्यात क्रॅश होऊन हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं.
हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचं गोदाम होतं. या गोदामाच्या भिंतीला हेलिकॉप्टर धडकलं. सुदैवाने हेलिकॉप्टर गोदामात कोसळलं नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
वायुदलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वायुदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचं प्राथमिक तपासात सांगण्यात येत आहे.