लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजप सरकारकडून लोकांची अपेक्षा फार वाढली आहे. येत्या २ वर्षात योगी कसं काम करतात यावर २ वर्षात येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं भवितव्य ठरणार आहे. निवडणुकीत भाजपने मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सरकार येताच पहिल्या २४ तासात कॅबिनेट बैठकीत हे शेतकरी कर्जमाफी आणि कत्तलखाने बंद करु असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले होते. पण मुख्यमंत्री होताच योगींनी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत.
१. १५ दिवसात द्या संपत्तीची माहिती
मुख्यमंत्री बनताच योगी आदित्यनाथ यांनी रविवार आपल्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर एक पत्रकार परिषद घेत योगी सरकारने एक मोठी घोषणा केली. यूपीत भाजप सरकारने त्यांच्या सर्व मंत्र्यांना १५ दिवसात संपत्तीची माहिती देण्यास सांगितलं आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कोणालाच माफ केलं जाणार नाही असं देखील सांगण्यात आलं आहे.
२. तरुणांसाठी रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेश सरकार तरुणांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी रोजरागावर भर देणार आहे. भाजपने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केले जातील असं देखील त्यांनी म्हटलं.
३. वादात्मक वक्तव्यापासून मंत्र्यांना लांब राहण्याचा सल्ला
आपल्या वक्तव्याने नेहमी वादात असणारे योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना विवादात्मक वक्तव्यांपासून लांब राहण्याचं आदेश दिले आहेत.
४. यूपी सरकारसाठी २ प्रवक्त्यांची नियुक्ती
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या दोन मंत्र्यांना श्रीकांत शर्मा आणि सिद्धार्थ नाथ सिंह यांना यूपी सरकारचे प्रवक्ते म्हणून नियुक्त केलं आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या दिल्ली मुख्यालयाचे मीडिया सेलचे प्रभारी होते.
५. ग्रामीण भागावर जास्त लक्ष
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे की, शेतीला उत्तरप्रदेशच्या विकासाचा आधार बनवला जाईल आणि शेतकऱ्यांचा विकास ही सरकारची प्राथमिकता असणार आहे. सोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे की, ग्रामीण भागाच्या विकासासाठी वेगळ्या योजना बनवल्या जातील.