CM Fadnavis On Fight In Kalyan Society: कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून झालेल्या तुफान राड्याचे पडसाद आज नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये उमटले. कल्याणमधील वादाचा व्हिडीओ समोर आला असून या वादात एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा मुद्दा सभागृहाच्या कामकाजदरम्यान उपस्थित करण्यात आला. अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलावून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली असून या मारहाणीत अभिजीत देशमुख गंभीर जखमी आहेत. अभिजितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याचसंदर्भाच विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई सुरु असल्याचं सांगितलं. या वेळेस फडणवीसांनी मांसाहारी आणि शाकाहारी भोजनावरुनही भाष्य केलं.
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस इमारतीत बुधवारी झालेल्या राड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या हाय प्रोफाईल इमारतीत अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादात हस्तेक्षेप करण्यास गेलेल्यांनाही शुक्लाने मारहाण केली. या प्रकरणावरुन संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यावरुन निवेदन केलं आहे.
"अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्ला हा एमटीडीसीमधे काम करणारा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे," अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. पुढे बोलताना फडणवीसांनी, "जे माज करतात त्याचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला? वसई विरारला कोणाच्या काळात मराठी माणूस गेला याचा शोध घ्यायला हवा," असा टोलाही लगावला.
"मराठी माणूस 300 स्केअरमीटरमध्ये राहतो. मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहतो याचा शोध घायला हवा. उत्तर प्रदेश बिहारमधून इथं आलेले लोक मराठी उत्तम बोलतात. सन उत्सव साजरा करतात. मात्र काहीजण चुकीचं बोलतात. त्यांना ठणकावून सांगतो मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येकाला काय खायचं याच स्वातंत्र्य दिलेलं आहे," अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी या विषयावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबरोबरच भेदभाव करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
नक्की वाचा >> 'वाल्मिक कराडचे कुणासोबत फोटो...'; बीड सरपंच हत्याप्रकरणी फडणवीसांची सभागृहात रोखठोक भूमिका
"घर नाकारण्याचा अधिकार कुणाला नाही. शाकाहार पुरस्कार करणारे कोणी असेल तर त्याबाबत अडचण नाही, मात्र याचा फायदा घेऊन कोणी भेदभाव करत असेल तर ते मान्य होणार नाही," असंही फडणवीसांनी सांगितलं.
सोसायटी राडा प्रकरणामध्ये कल्याण पोलिसांनी 10 आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांना पकडले आहे. सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुख्य आरोपी अविनाश शुक्ला अजूनही फरार आहे.