बिहारमध्ये माफियांच्या दबावामुळे 'मराठी सिंघम'ची बदली

गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात आघाडीवर असलेले शिवदीप लांडे यांची माफियांच्या दबावामुळे बदली झाल्याची चर्चा सध्या बिहारमध्ये आहे. शिवदीप लांडे हा मराठी अधिकारी पहिल्या दिवसापासून बिहारमधील गुंड आणि माफियांना मात देत आहे.

Updated: Jan 25, 2016, 09:49 AM IST
बिहारमध्ये माफियांच्या दबावामुळे 'मराठी सिंघम'ची बदली title=

पाटणा : गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात आघाडीवर असलेले शिवदीप लांडे यांची माफियांच्या दबावामुळे बदली झाल्याची चर्चा सध्या बिहारमध्ये आहे. शिवदीप लांडे हा मराठी अधिकारी पहिल्या दिवसापासून बिहारमधील गुंड आणि माफियांना मात देत आहे.

शिवदीप लांडे यांच्या नावानेच खाण माफियांच्या मनात धडकी भरते, शिवदीप लांडे यांनी अनेक वेळा बेकायदेशीर खाणी स्वत: जेसीबी मशीन चालवून उद्धवस्त केले आहेत. रोड रोमियोंचाही समाचार घेतल्याने बिहारमधील मुलींमध्ये मराठी सिंघम शिवदीप लांडे प्रचंड लोकप्रिय आहेत.

या वेळेस खणन माफियांवर मोठी कारवाई शिवदीप लांडे यांनी केली, यामुळे सरकारला करोडोंचा फायदा झाला असावा, मात्र माफियांचं आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱयांचं धाब दणाणल्याने, शिवदीप लांडे यांची बदली करण्यात आली.

माफियांविरोधात धडक कारवाई शिवदीप लांडे करत असल्याने त्यांची बदली करण्यात आली, असा रिपोर्ट आयबीने दिला असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र आयबीचा रिपोर्ट नसल्याचं बिहारमधील पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

शिवदीप लांडे यांना पहिली ट्रेनिंग पोस्ट ही मुंगेरला दिली होती, मुंगेर हा अतिशय धोकादायक प्रदेश असल्याचं त्यांना तेथे गेल्यानंतर कळलं, कारण त्यांच्यापूर्वी असलेल्या एका एसपीची हत्या करण्यात आली होती, तरीही शिवदीप लांडे यांनी तेथील कथित माफिया आणि गुंडांना चांगलाच चोप दिला होता.

बिहारी लोकांमध्ये शिवदीप लांडे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. यू-ट्यूबवर अनेक युवकांनी शिवदीप लांडे यांच्यासाठी व्हिडीओ बनवले आहेत. यावरून शिवदीप लांडे यांच्या दबंगपणाची कल्पना येते.