मुंबई : देशातील परिस्थितीवर वक्तव्य केल्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता चांगलाच वादात सापडला आहे. देश सोडण्याच्या वक्तव्यावरून आमिर खानवर अनेक स्तरांतून टीका होत असतानाच आता त्याच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे.
दिल्लीच्या न्यू अशोक नगरमध्ये आमिर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. देशातील वादग्रस्त ठरलेल्या 'असहिष्णुते'च्या मुद्द्यावर बोलताना आमिरनं आपल्या घाबरलेल्या पत्नीनं किरणनं देश सोडून जाण्याचा दिलेला सल्ला जाहिररित्या बोलून दाखवला. याच विरोधात दिल्लीच्या उल्हास रेवांकर नावाच्या व्यक्तीनं त्याच्या विरोधात तक्रार करत दाखल करत 'भारतात राहिल्यानं आमिरला भीती वाटतेय का?' असा प्रश्नदेखील केला आहे.
आमिरनं या पद्धतीचे गंभीर आणि देशातलं वातावरण बिघडवणारी वक्तव्यं करू नयेत, असंही त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय.
आमिरच्या या वक्तव्याविरोधात अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे तर काहींनी आमिरचा बचावही करण्याचा प्रयत्न केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'असं वक्तव्य करण्यासाठी हिंमत हवी' असं म्हणत आमिरचा बचाव केला आहे. आमिरवर होणाऱ्या वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मुंबईच्या घराबाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर आमिर खान हा ट्विटरवर टॉप ट्रेंड बनला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.