कॉर्पोरेट गुप्तहेरी प्रकरण : १० हजार करोड रुपयांचा घोटाळा?

महत्त्वाची कागदपत्रं चोरी करण्याच्या प्रकरणात पत्रकार शांतनु सैकिया यानं आपल्याला या प्रकरणात गोवलं जात असल्याचं म्हटलंय. 

Updated: Feb 21, 2015, 09:35 PM IST
कॉर्पोरेट गुप्तहेरी प्रकरण : १० हजार करोड रुपयांचा घोटाळा? title=

नवी दिल्ली : महत्त्वाची कागदपत्रं चोरी करण्याच्या प्रकरणात पत्रकार शांतनु सैकिया यानं आपल्याला या प्रकरणात गोवलं जात असल्याचं म्हटलंय. 

रिमांडसाठी पटियाला हाऊस कोर्टात आणलेल्या शांतनुनं पोलीस व्हॅनमधून खाली उतरताना बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना ओरडून म्हटलं... 'हा १० हजार करोड रुपयांचा घोटाळा आहे. मी याच्या कव्हर-अप ऑपरेशनमध्ये होतो... कृपया माझं म्हणणं दाखवा'.  आपल्याला फसवलं जात असल्याचा दावाही सैकियानंही केलाय.

दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयातल्या हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 12 जणांना दिल्लीच्या पतियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. या प्रकरणी आरोपींची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांची कोठडी मागितली.

शनिवारी दिल्ली पोलिसांनी ऊर्जा क्षेत्राशी निगडीत कंपन्या, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मॅनेजर कॉर्पोरेट अफेअर्स शैलेश सक्सेना, जुबलिएन्ट एनर्जीचे सिनीयर एक्झिक्युटिव्ह सुभाष चंद्रा, रिलायन्स एडीएजीचे डीजीएम ऋषी आनंद, एस्सारचे डीजीएम विनय आणि केयर्न्स इंडियाचे जीएम के के नायक यांना कोर्टात हजर केलं होतं. इथून त्यांना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडण्यात आलंय.  

सरकारचं कौतुक व्हायला हवं - राजनाथ सिंग
याप्रकरणी 12 जणांना करण्यात आलेली अटक आणि धक्कादायक खुलासे यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिलीय.. आरोपींची गय केली जाणार नाही असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.. लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल असंही गृहमंत्र्यांनी म्हटलंय.. ब-याच दिवसांपासून सुरु असलेलं हे हेरगिरी प्रकरण उघड झाल्यामुळे सरकारचं कौतुक झालं पाहिजे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

केंद्र सरकारच्या मंत्रालयातल्या हेरगिरी प्रकरणी एक नवा खुलासा समोर आलाय. पोलिसांनी या प्रकरणी एफ आय आर दाखल केलीय. केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पावेळी करणार असलेल्या भाषणाशी संबंधीत कागदपत्रं गहाळ झाल्याचं यात उघड झालंय. झी मीडियाच्या हाती हेरगिरी प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफ आय आर ची प्रत आहे. 

आरोपींकडे सापडली गोपनीय कागदपत्रं... 
त्यात आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणाशी संबंधित गोपनीय दस्तावेज, आरोपींकडे मिळाल्याचं एफ आय आर मध्ये नोंदवण्यात आलंय. याखेरीज नॅचरल गॅस ग्रिडशी संबंधित कागदपत्रंही जप्त करण्यात आलीत. तसंच पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ऍनॅलिसिस सेलच्या मासिक गॅस अहवलाची फोटोकॉपी सुद्धा मिळाली आहे. गंभीर बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेले पास, हेरगिरीतल्या या आरोपींकडे मिळाले आहेत. तसंच आरोपींकडून ऑडिट डिपार्टमेंट डिफेन्स सर्विसचंही ओळखपत्र मिळालंय. सोबतच मंत्रालयांच्या तातडीच्या बैठकींशी संबंधित माहितीच्या फोटोकॉपी, शिवाय श्रीलंकेत करायच्या गुंतवणुकीबाबतच्या माहितीची सुद्धा फोटोकॉपी मिळालीय. तसंच कित्येक अतिवरिष्ठ अधिका-यांच्या स्वाक्ष-यांची कागदपत्रं आणि ओळखपत्रंही पोलिसांनी जप्त केली आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.