दिल्ली गँगरेप : आज दाखल होणार आरोपपत्र

दिल्ली गँगरेपप्रकरणी आज दिल्ली पोलीस आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 3, 2013, 09:11 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेपप्रकरणी आज दिल्ली पोलीस आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. हे आरोपपत्र ई स्वरुपात असून एक हजार पानांचं असल्याचं सांगण्यात येतंय. गुप्तता पाळण्यासाठी आरोपपत्र ई स्वरुपात तयार करण्यात आलंय.
पाच किंवा सहा आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. सहा आरोपींपैकी एकजण अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात आलाय. त्याच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्या खटल्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. या आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, खून, अपहरण, चोरी अशा कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. खटल्यात पीडित तरुणीचा मित्र आणि सिंगापूरमध्ये तरुणीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना साक्षिदार करण्यात आलंय.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपी, बस चालक राम सिंह, त्याचा भाऊ मुकेश, अक्षय ठाकूर, पवन आणि विनय यांना अटक केलीय. पोलिसांनी या आरोपींविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), २०१ (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न), ३६५ (अपहरण), ३७६ – २ जी (सामूहिक बलात्कार), ३७७ (असामान्य अपराध), ३९४ (जखमी करणं) आणि ३४ नुसार गुन्ह्याची नोंद केली होती. त्यामध्ये कलम ३०२ नुसार हत्याचा गुन्ह्याचाही समावेश करण्यात आलाय.