नवी दिल्ली : पंतप्रधानांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत. बचत खात्यातून पैसे काढण्यावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातले होते. टप्प्या टप्प्यानं पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली.
सध्या आठवड्याला एका बचत खात्यातून 50 हजार रुपये काढण्याची मुभा होती, पण आजपासून ही मर्यादाही हटवण्यात आलीय, त्यामुळे आता तुमच्या बचतखात्यातून तुम्हाला कितीही रक्कम काढता येणार आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात असलेल्या जवळपास 86 टक्के नोटा एका रात्रीत रद्द झाल्या. त्यामुळे रद्द झालेल्या नोटा पूर्ण व्यवस्थेतून बाहेर काढून त्यांच्या जागी तितक्याच किमतीच्या नव्या नोटा बाजारात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेला जवळपास साडे चार महिन्याचा कालावधी लागला.