अहमदाबाद : सोहराबुद्दीन आणि इशरत जहाँ फेक एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी जी वंझारा हे जवळपास ९ वर्षानंतर गुजरातमध्ये परतले. यावेळी त्यांचं ढोल आणि ताशांनी स्वागत करण्यात आलं.
इशरत जहाँ चकमक प्रकरणात निलंबित वंझारा यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर गेली ९ वर्ष वंझारा गुजरातच्या बाहेर होते. अहमदाबाद गुन्हे शाखेमध्ये उपायुक्त असणारे वंझारा एप्रिल २००७ पासून तुरुंगात होते.
या प्रकरणात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांना जामीन मिळाला होता. मात्र, गुजरातमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच, देश सोडण्यावरही बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता जामिनातील अटींमध्ये दिलासा मिळाल्यानंतर वंझारा गुजरातमध्ये परतलेत.
'लष्करे तैयबा'चा दहशतवादी डेव्हिड हेडलीच्या जबाबामध्ये इशरत जहाँ ही दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे, वंझारा यांनी जामिनातील अटींमध्ये बदल करण्याची परवानगी कोर्टामध्ये मागितली होती. त्यानुसार त्यांना गुजरातमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती.
यावेळी वंझारा यांना एअरपोर्टवर रिसिव्ह करण्यासाठी अनेक लोक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी नवी मर्सिडीज आणण्यात आली होती. ही मर्सिडीज त्यांना त्यांच्या मुलानं गिफ्ट दिल्याचं सांगण्यात येतंय.
'भारत माता की जय' असे नारे देत त्यांच्या कुटुंबीयांनी वंझारांचं स्वागत केलं. आपली सुटका आणि गुजरातमधली 'घरवापसी' म्हणजे गुजरात पोलिसांचं यश असल्याचं ते म्हणतायत.
गुजरातमध्ये ढोल ताशांसह वंझारांचं स्वागत झालं. यावेळी त्यांनी तलवार डान्सही केला.
WATCH: Former Gujarat DIG DG Vanzara dances at a function in Ahmedabad after court permitted him to enter statehttps://t.co/bpJV9KuJih
— ANI (@ANI_news) April 8, 2016