नवी दिल्ली : पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच डिझेल स्वस्त झालंय. केंद्रानं नियंत्रण उठविताच डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर ३ रुपये ३७ पैशांच्या कपातीचा निर्णय जाहीर झाला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नसल्यानं प्रत्यक्षातील कपात प्रतिलीटर चार रुपयांपर्यंत असेल.
पाच वर्षात पहिल्यांदाच डिझेलच्या किमतीत कपात झाली असून, यापुढं हे दर थेट बाजारातील चढ-उतारानुसार ठरतील आणि सरकारी तिजोरीवरही अनुदानाचा बोजा पडणार नाही. आजमितीस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरलेल्या असल्यानं त्याचा लाभ ग्राहकांना होणार असला, तरी यापुढं सबसिडीचा संबंध राहणार नसल्यानं भविष्यात कच्च तेल महागलं, तर वाढीव किमतीचा बोजा सोसण्याची तयारी लोकांना ठेवावी लागणार आहे.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी इथं पत्रकार परिषदेद्वारे डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला. जून २०१० मध्ये पेट्रोलचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर डिझेलचे दरही नियंत्रण मुक्त करण्याची मागणी जोर धरीत होती. विशेषत: आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानंतर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानंतर सरकारी तिजोरीवर बोजा वाढत असल्यामुळं ही मागणी होत होती.
त्यामुळं जानेवारी २०१२ मध्ये डिङोलचे दर प्रतिमहिना ५० पैशांनी वाढविण्याचा निर्णय घेत गेल्या दीड वर्षात सरकारनं हा तोटा भरून काढला. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात किमती प्रतिबॅरल ८३ डॉलरपर्यंत कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.