बंगळुरु : शहरात एका नायजेरीयन महिलेपुढे पोलीस पुरते हतबल झाल्याचं पाहायला मिळाले. नशेमध्ये पूर्ण बुडालेल्या महिलेनं आधी परिसरातल्या दुकानदारांशी हुज्जत घातली. नंतर रस्त्यावरुन येजा करणा-यांनाही तिनं शिव्या घातल्या.
लोकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. आणि ही नायजेरीयन महिला पोलिसांनाच थेट भिडली. पोलिसांना तिने मारहाण केली. कसेबसे तिला पोलिसांनी पकडून रुग्णालयात तपासणीसाठी नेले. मात्र तिथेही तिने रुग्णालयात तोडफोड सुरु केली.
रुग्णालय कर्मचारी आणि पोलीस सा-यांनीच तिच्यापुढे हात टेकले. अखेर ती गाफील असताना, लोकांनी तिच्या मागून येऊन तिच्या अंगावर चादर टाकली आणि तिला जेरबंद केलं. त्यानंतरही तिच्याकडून या सर्वांचा उद्धार सुरुच होता. दरम्यान पोलिसांनी तिच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.