नवी दिल्ली : गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखालच्या FTII संचालक मंडळाला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता येईल अशी शक्यता आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं संचालक मंडळानं गेल्या सव्वा वर्षात केलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केलंय. पीटीआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गजेंद्र चौहान आणि त्यांच्या संचालक मंडळात जून 2018 पर्यंत कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ आज संपतोय, त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याबाबत आजच अधिकृत परिपत्रक निघण्याची शक्यता आहे. गजेंद्र चौहान आणि त्यांच्या संचालक मंडळानं एफटीआयआयच्या अभ्यासक्रमात अनेक स्वागतार्ह्य बदल केले आहेत.
गेल्या वर्षभराच्या काळात एफटीआयआयमध्ये अत्याधुनिक थिएटर रुम साकारण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी 17 आणि 18 ऑक्टोबरला एफटीआयआयचा परिसर सामन्य जनतेसाठी खुला करण्यात आला. याकाळात सुमारे तेरा हजार विद्यार्थी, तरुण आणि सिनेमाप्रेमींनी परिसराला भेट दिली.
या उपक्रमांमुळे माहिती प्रसारण मंत्रालय संचालक मंडळाविषयी सकारात्मक विचार करत असल्याचं पीटीआयनं म्हटलं. मे 2015मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यावर जून महिन्यात गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीवरून देशात, प्रमुख्यानं एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये मोठा विरोध झाला. जवळपास चार महिने एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचा संप सुरू होता.