गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघातीच - सीबीआय

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने दिली. 

Updated: Oct 8, 2014, 08:33 AM IST
गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघातीच - सीबीआय title=

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने दिली. 

दिल्लीत ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे आपल्या खासगी वाहनाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात असताना पृथ्वीराज- तुघलक रोड परिसरात त्यांच्या गाडीला अन्य एका कारने जोराची धडक दिली होती. या अपघातात मुंडे गंभीर जखमी झालेत. त्यांच्या मानेला आणि यकृताला गंभीर दुखापत झाली होती. यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी म्हटले. 

मुंडे यांच्या  निधनाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला होता. या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयने सर्व बाजू आणि शक्‍यता पडताळून पाहिल्या तसेच या अपघाता आधीच्या घटना आणि संशयास्पद व्यक्‍तींचीही चौकशी करण्यात आली. यावरून मुंडे यांच्या या मृत्यूमागे घातपात नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे.

मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या कारचा चालक गुरविंदर सिंग याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मुंडे गंभीर जखमी झाल्यामुळेच निधन झाल्याचे स्पष्ट करत सीबीआय घातपाताची शक्‍यता फेटाळून लावली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

Tags: