अखेर बाबा रामपालला अटक... हिस्सार पोलिसांची कारवाई

 अखेर पोलिसांनी रामपालला अटक केलीय. बाबा रामपाल याला बरवाला इथल्या सतपाल आश्रमातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

Updated: Nov 19, 2014, 09:39 PM IST
अखेर बाबा रामपालला अटक... हिस्सार पोलिसांची कारवाई title=

हिसार (हरियाणा) : हरियाणाला वेठीला धरणाऱ्या रामपालच्या बाबागिरीचा ‘द एन्ड’ झालाय. अखेर पोलिसांनी रामपालला अटक केलीय. बाबा रामपाल याला बरवाला इथल्या सतपाल आश्रमातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

तब्बल दोन दिवसांनंतर पोलिसांना या स्वयंघोषित 'जगतगुरू' अटक करण्यात यश आलंय. यानंतर रामपालला घेऊन पोलीस चंदीगडला रवाना झालेत. 

गेली ३६ तास इथं हिंसाचार सुरू होता. रामपाल यांच्य़ा जवळपास ४००० समर्थकांनी पोलिसांना अडवून धरलं होतं. अखेर, 'सीआरपीएफ'च्या जवानांनी आश्रमात घुसून ही कारवाई केलीय. यासाठी, काही पोलिसांना साध्या वेषात आश्रमात प्रवेश करावा लागला. 

या, कारवाईसाठी सीआरपीएफच्या पाच तुकड्या मागवण्यात आल्या होत्या. सीआरपीएफच्या एका तुकडीत १००१ जवान असतात. म्हणजेच, या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तब्बल  ५००५ जवान मागवण्यात आलेत.

सायंकाळी हरियाणा पोलिसांनी सतलोक आश्रमातून अनेक समर्थकांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली होती. आत्तापर्यंत जवळपास ७० जणांना अटक करण्यात आलीय. यात रामपालचा भाऊ पुरूषोत्तम दासचाही समावेश आहे. पुरुषोत्तम रामपालचा प्रवक्त्या म्हणूनही काम करतोय. या ७० जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीय. 

 


तणावपूर्ण परिस्थिती

हिस्सारमधील संघर्षात ६ जणांचा मृत्यू...

वादग्रस्त संत रामपालच्या अटकेवरून सुरू असलेला संघर्ष आता वाढतच चाललाय. हरियाणाचे पोलीस महासंचालक एस.एन. बशिष्ठ यांनी सांगितलं की, कायदा न माणणाऱ्या रामपाल यांनी सरेंडर करायला हवं. आतापर्यंत यात ६ जणांचा मृत्यू झालाय. त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. 

त्यांनी सांगितलं की, आश्रमातून १० हजार लोकांना बाहेर काढलंय. अजूनही पाच हजार लोक आत फसलेले आहेत, ज्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. रामपाल आज संध्याकाळपर्यंत सरेंडर करू शकतात, असंही ते म्हणाले. कारण हरियाणा सरकार आता रामपालसोबत बातचित करण्याच्या मूडमध्ये नाहीय. 

बशिष्ठ म्हणाले, पाच हजार निर्दोष लोकांना वाचवणं आमची प्राथमिकता आहे. बाहेर काढल्या गेलेल्या लोकांमध्ये लहान मुलं आणि महिलांची संख्या जास्त आहे. रामपाल अजूनही आश्रमात उपस्थित आहेत. पोलिसांकडून एकही गोळी चालवली गेली नाही, असंही महासंचालकांनी स्पष्ट केलंय. 

दरम्यान हरियाणात रामपाल याच्याविरोधात काल सुरु झालेल्या कारवाईला सुरुवातीपासून हिंसक वळण लागलं. कारवाईदरम्यान काल पोलीस आणि रामपालच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री झाली. समर्थकांनी केलेल्या तीव्र विरोधाला न जुमानता पोलिसांनी आश्रमाची भिंत पाडून आत प्रवेश केला. हिस्सारमधील कारवाईप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयानं खट्टर सरकारकडून अहवाल मागवला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.