www.24taas.com, चेन्नई
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा खरा व्हिडिओ दाबून ठेवण्यात आला , मानवी बॉम्ब बनलेली धनू या व्हिडिओमध्ये दिसत होती. सुरक्षेतील गलथानपणा उघडकीस येऊन नये. त्यामुळे तो चौकशी पथकाला दाखवला नाही, ` असा आरोप या हत्या प्रकरणातील मुख्य चौकशी अधिकारी के . रागोथामन यांनी केला आहे . काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कसलेही नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ दाबून ठेवण्यात आल्याचेही यात म्हटले आहे.
` कॉन्स्पिरसी टू कील राजीव गांधी : फ्रॉम सीबीआय फाइल्स ` या आपल्या पुस्तकात रागोथामन यांनी राजीव गांधी हत्याकांडातील ` लपवाछपवी ` वर प्रकाश टाकला आहे . ` १९९१ साली राजीव गांधी ज्या ठिकाणी सभा घेणार होते , त्या ठिकाणी तब्बल अडीच तास आधीच एलटीटीईचे मारेकरी हत्यारे घेऊन सज्ज होते . मानवी बॉम्ब बनलेली धनू हीसुद्धा त्यांच्याबरोबर होती . हत्येच्या दुसऱ्या दिवशी या साऱ्याचा पुरावा असलेला व्हिडिओ गुप्तचर विभागाच्या ( आयबी ) हाती लागला होता . हा व्हिडिओ उघड झाला असता तर काँग्रेस सरकारच्या बेफिकरीचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असते . या साऱ्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसला असता . त्यामुळेच आयबीचे तत्कालीन प्रमुख एम . के . नारायणन यांनी हा व्हिडिओ दडपला `, असे रागोथामन यांनी म्हटले आहे .
`तामिळनाडू पोलिसांना आयबीने वेगळाच व्हिडिओ दिला होता . तो व्हिडिओ दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडिओंसारखा गुळमुळीत होता . त्यातून सत्य बाहेर आलेच नाही . मानवी बॉम्ब बनलेली धनू ही राजीव गांधी सभास्थळी आल्यावर तिथे आल्याचे त्यात दाखविण्यात आले होते . ते चुकीचे आहे ,` असा दावाही रागोथामन यांनी केला आहे . एम . के . नारायणन हे राजीव गांधीच्या खूपच जवळचे होते . पण त्यांच्या हत्येची वस्तुस्थिती मांडून काँग्रेसला हानी पोहोचविण्याची हिंमत त्यांच्याकडे नव्हती , असेही रागोथामन यांनी म्हटले आहे .
एसआयटीचे तत्कालीन प्रमुख डी. आर. कार्तिकेयन यांनीही हा मुद्दा पुढे रेटला नाही. तर नारायणन यांना पुढे जाण्यास परवानगी नव्हती. तपासातून चक्रे एलटीटीईचा प्रमुख प्रभाकरनपर्यंत गेली. हा सर्व घटनाक्रम लिहून घेण्याचा प्रयत्न केला. प्रभाकरन मारल्या गेल्यानंतर मी पुस्तक लिहीण्याचा निर्णय घेतला, असे रागोथामन यांनी सांगितले.