नवी दिल्ली: संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मनेका गांधी यांनी राजकारणामध्ये आपली मदत करावी अशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची इच्छा होती. पण त्यावेळी मनेका गांधी अशा लोकांबरोबर होत्या जे राजीव गांधींचे विरोधक होते.
इंदिरा गांधींचा सोनियांवर जास्त जीव होता, पण संजय गांधींच्या मृत्यूनंतर मात्र इंदिरा मनेका गांधींच्या जास्त जवळ गेल्या होत्या. हे आणि असे अनेक खुलासे इंदिरा गांधींचे डॉक्टर के.पी.माथूर यांनी आपलं पुस्तक 'द अनसीन इंदिरा गांधी' मध्ये केले आहेत.
इंदिरा गांधीतर मनेकांच्या जवळ जात होत्या पण मेनका मात्र कधीच इंदिरांच्या जवळ गेल्या नाहीत. सोनिया गांधी बहुतेक वेळा घरातील कामं सांभाळत होत्या. पण मेनका गांधींना राजकारणाची चांगली समज असल्याचं इंदिरांना वाटायचं, असंही या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.
संजय गांधींच्या निधनानंतर काही वर्षानंतर मेनका गांधींनी पंतप्रधान बंगला सोडला. मेनका गांधींनी संजय विचार मंच नावाची संघटनाही काढली. ही संघटना संजय गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काढण्यात आली होती. पण या संघटनेमध्ये राजीव गांधींचे विरोधक होते. असा दावा डॉ. माथूर यांनी केला आहे.
लखनऊमध्ये होणाऱ्या संजय विचार मंचाच्या संमेलनाला संबोधित करु नका असा संदेश परदेश दौऱ्यावर असताना इंदिरा गांधींनी मनेका गांधींना पाठवला होता, पण मेनका गांधींनी मात्र इंदिरांचं न ऐकता या संमेलनामध्ये भाषण केल्याचं, या पुस्तकात सांगण्यात आलं आहे.