जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार'

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.

Updated: Dec 15, 2016, 10:36 AM IST
जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार' title=

चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.

जयललिता यांच्या मैसूरमध्ये राहणाऱ्या काही कुटुंबियांनी त्यांच्यावर हिंदू पद्धतीनुसार दाह संस्कार केले. जयललिता या मैसूरच्या उच्च ब्राह्मण समजल्या जाणाऱ्या अय्यंगार कुटुंबातून होत्या. कुटुंबियांसाठी त्यांचा अंत्यसंस्कार हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता.

असा झाला 'सांकेतिक अंत्यसंस्कार'

कुटुंबियांनी जयललिता यांच्या पार्थिवाऐवजी एका बाहुलीची प्रतिकृती दफनविधीसाठी ठेवली होती. सुक्या घासापासून बनलेल्या या बाहुलीला 'दरबा' असं म्हटलं जातं. आचार्य रंगनाथ यांनी या साऱ्या विधी पूर्ण केल्या. यानंतर त्यांचा नववा आणि दहाव्याच्या विधीही केल्या जाणार आहेत. जयललिता यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, 'त्यांचा अंत्यदाह झाला नाही तर त्यांना मोक्ष प्राप्त होणार नाही'... त्यामुळे हा अंत्यदाह विधी पार पाडण्यात आला. 

दीर्घकाळाच्या आजारानंतर ५ डिसेंबर रोजी जयललिता यांचं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर द्रविड पक्षाच्या परंपरेनुसार त्यांचे मेन्टॉर एमजीआर यांच्या जवळच मरीना बीचवर त्यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आलं होतं. द्रविड आंदोलन कोणत्याही हिंदू धर्म किंवा कोणत्याही ब्राह्मणवादी परंपरा आणि विधींवर विश्वास ठेवत नाही. एका ब्राह्मणवाद विरोधी पक्षाच्या प्रमुख असेलल्या जयललिता यांच्यावर याआधी त्यांच्या जवळची मानली जाणारी त्यांची मैत्रिण शशिकला यांनी अंत्यसंस्कार केले होते.