www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यश मिळाले आहे. बहुचर्चित लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या लोकपाल विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले आहे.
राज्यसभेने सुधारित केलेल्या लोकपाल विधेयकाला १७ डिसेंबरला आणि त्यानंतर लोकसभेने १८ डिसेंबरला मंजुरी दिल्यानंतर हे अतिशय महत्त्वाचे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले होते. लोकसभा सचिवालयातून याची प्रत मंगळवारी कायदा विभागात पाठवली होती. त्यानंतर तेथून या विधेयकाची प्रत राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आली होती.
४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले. नववर्षाची भेट देत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लोकपाल विधेयकावर स्वाक्षरी केली. प्रतीक्षेत असलेला लोकपाल कायदा अखेर प्रत्यक्षात आला.
लोकपालसाठी अण्णा हजारे यांनी मोठे जनआंदोलन उभारले अखेर अण्णांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. आता लोकपाल विधेयकामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी देताना लोकायुक्त कायदा लवकर आणावा, अशी मागणीही केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.