नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणात भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध अजून ताणले जात आहेत. माजी संरक्षण मंत्री आणि गोवाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणात पाकिस्तानला इशारा दिला आहे. पर्रिकर यांनी म्हटलं आहे की, 'पाकिस्तान कुलभूषण जाधव प्रकरणात एक खतरनाक खेळ खेळतो आहे.'
गोवाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दूरदर्शन दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, 'पाकिस्तान स्वतःला कसाही दाखवत असला तरी त्याला समजलं पाहिजे की जर भारताने याला उत्तर देत कारवाई सुरु केली तर त्यांच्याकडे संघर्ष करण्यासाठी देखील ताकत नसणार आहे.'
'आम्ही शांतप्रिय लोकं आहोत. आम्हाला कोणताही तणाव नकोय. त्यामुळे त्यांनी जाधव यांना परत पाठवावं. पाकिस्तानने त्यांचं अपहरण केलं आहे. ते पाकिस्तानात नव्हते तर इराणमध्ये होते.'
पर्रिकर यांच्या मते ईरानने म्हटलं की, 'तालिबानने त्यांचं अपहरण केलं आणि पाकिस्तानला घेऊन गेले. पाकिस्तानला काहीना काही करत राहण्याची सवय आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना योग्य उत्तर दिलं आहे. जर जाधवला पाकिस्तानने फासी दिली तर भारत शांत नाही बसणार.'