नवी दिल्ली : ‘आयएसआयएस’चं ट्विटर अकाऊंट चालविणाऱ्या बंगळुरूच्या मेहदी मसरूर विश्वास या तरुणाला नुकतीच अटक करण्यात आलीय. त्याची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आलीय.
चौकशी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘इसिस’शी निगडीत असणाऱ्या या तरुणाबद्दल खळबळजनक माहिती उघड केलीय. या तरुणाच्या मनात कट्टरपंथी भावना इतक्या घट्ट बसल्यात की आपल्या ‘शत्रुचं’ मुंडकं छाटणं ही गोष्टही त्याला चुकीची वाटत नाही तसंच शरणार्थी किंवा पळवून आणलेल्या महिलांना आपल्या लैंगिक वासनेचं बळी बनवणंही त्याला चुकीचं वाटत नाहीय.
बंगळुरूमध्ये १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या २४ वर्षीय मेहदीनं चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर, आपला इस्लामच्या कट्टर स्वरुपावर विश्वास आहे आणि भविष्यात एक दिवस नक्कीच संपूर्ण जगावर ‘खिलापत’ किंवा इस्लामी राज्य स्थापन होईल, असा विश्वास असल्याचं म्हटलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहदी भारतीय मुस्लिमांचा उल्लेख ‘सरकारी मुस्लिम’ म्हणून करतो... सरकारविरुद्ध लढण्यास भारतीय मुस्लिम असक्षम असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, शत्रुचं मुंडकं छाटणं आणि स्त्रियांना लैंगिक इच्छांची पूर्ती करण्यासाठी वापरणं या गोष्टी इस्लामध्ये योग्यचं मानल्या गेल्यात.
इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेला पण सध्या जेहादी प्रचारक बनलेल्या मेहदीनं चौकशी अधिकाऱ्यांना, आपण २००९ पासूनच सीरिया, इराक आणि अफगानिस्तानातील राजकीय घटनाक्रमांवर लक्ष ठेऊन असल्याचं सांगितलंय... त्यानंतर आपण इसिसचा समर्थक बनून या दहशतवादी संघटनेचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यानं म्हटलंय.
मेहदीच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणत्याही व्यक्तीच्या ‘इसिस’मध्ये सहभागी होण्याबद्दल कोणतीही माहिती नाहीय... आणि त्यानं कधीही कोणत्याही इस्लामिक स्टेटच्या कोणत्याही दहशतवाद्याशी संभाषणही केलेलं नाही. पण, चौकशी अधिकाऱ्यांनी मात्र मेहदी खोटं बोलत असल्याचं म्हटलंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, मेहदीच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईतील जे तीन युवक सध्या इराक-सीरियामध्ये आहेत त्यातील एक तरुण इसिसचं ट्विटर चालवतोय... आणि इसिसच्या समर्थनार्थ ट्विट करतोय.
आपल्या अटकेपूर्वी ४-५ दिवसांपासून मेहदी खूप चिंतेत होता. आपण आपल्या भविष्याबाबत काहीही निश्चित करू शकत नसल्याचं त्यानं त्याच्या आईसमोर म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.