नवी दिल्ली : अणु पुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यात चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
भारताला एनएसजीमधील समावेशासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळाला आहे तरी मात्र आशिया खंडातून चीन भारताच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करत आहे.
भारताला आणखी एक वर्ष एनएसजीमध्ये स्थान मिळवण्यापासून दूर ठेवण्याचा चीनचा मानस आहे असे दिसतेय. चीनचा हा प्रयत्न उलथून पाडण्यासाठी मोदींनी थेट पुतिन यांना फोन करून सहकार्याची विनंती केल्याचे समजते. दरम्यान, मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेचे रशियन सरकारने निवेदन जाहीर केले आहे.
जागतिक राजकारणात रशियाने नेहमीच भारताला पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठीही रशियाचा भारताला पाठिंबा आहे. भारत - अमेरिकेचे संबंधदेखील गेल्या काही दिवसांत सुधारले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन येत्या काही दिवसात भेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील महत्वाच्या तसंच सहकार्याच्या मुद्यांवर या भेटीत चर्चा होऊ शकते. येत्या काही दिवसांत एनएसजीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी उच्चस्तरीय बैठका घेऊ शकतात.