सरदार सरोवराची उंची वाढणार, महाराष्ट्राला मिळणार 400 मेगावॅट वीज

नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि महाराष्ट्राला एक मोठी भेट दिलीय असं म्हणता येईल. कारण महाराष्ट्राला यामुळे 400 मेगावॅट मोफत वीज मिळणार आहे.

Updated: Jun 12, 2014, 04:56 PM IST

www.24taas.com, दीपक भातुसे, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि महाराष्ट्राला एक मोठी भेट दिलीय असं म्हणता येईल. कारण महाराष्ट्राला यामुळे 400 मेगावॅट मोफत वीज मिळणार आहे.
कारण नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये घेतलेल्या सभेत, महाराष्ट्राला 400 मेगावॅट मोफत वीज मिळणार असल्याचं म्हटलं होतं.
सरदार सरोवराची उंची वाढवण्यास परवानगी कधी मिळेल, या केंद्र सरकारच्या निर्णयाकडे गुजरात सरकारची अनेक दिवसांपासून नजर लागून होती.
केंद्र सरकारने नर्मदा धरणाची उंची वाढवण्यासाठी गेट लावण्याची परवानगी दिली आहे. सध्या नर्मदा डॅमची उंची 122 मीटर आहे, ही उंची वाढवून 138 मीटर करण्यात आली आहे.
गुजरात सरकारची ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, यूपीए सरकारच्या काळात हे काम झालं नाही.
दोन दिवसाआधी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्या होत्या. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आनंदीबेन पटेल यांनी ही मागणीही ठेवली होती.
मोदी सरकारने दोन दिवसानंतर गुजरात सरकारच्या मागणीचा विचार केला आणि उंची वाढवून गेट लावण्यास परवानगी दिली आहे.
गुजरातमधील अनेक सामाजिक संघटना सरदार सरोवराची उंची वाढवण्याच्या मागणीचा विरोध करत होते.
मात्र नर्मदा बचाव आंदोलनाच्या काही आदिवासींच्या प्रतिनिधी मंडळाने सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, आणि धरणाची उंची वाढवण्याआधी पूनर्वसनाचं काम पूर्ण करण्याची मागणी केली.
एनबीएच्या माहितीनुसार महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील, अडीच लाख लोक या धरणाने प्रभावित होणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.