नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध घालण्याचा प्रस्ताव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नोटांच्या अदलाबदलीसाठी अनेक जण वारंवार रांगांमध्ये उभे राहत आहेत. काही जण दुसऱ्यांच्या नोटा बदलण्याची कामं करत आहेत.
यामुळे सरकार जुन्या नोटांवर आणखी निर्बंध घालण्याची शक्यता असल्याचा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण नवे निर्बंध घालण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं एएनआयला सरकारमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे.
सरकारनं सुरूवातीला चार हजार रुपयांच्या अदलाबदलीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याची साडेचार हजारांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली होती. मात्र काही गैरप्रकार होत असल्याची तक्रार आल्यानंतर सरकारनं पुन्हा ही मर्यादा दोन हजार रुपयांवर आणली. सध्या तरी ही मर्यादा दोन हजार रुपयांवरच राहणार आहे.