चेन्नई : जयललिता यांचे विश्वस्त ओ पनीरसेल्वम आज (सोमवारी) तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पनीर सेल्वम यांना रविवारी अन्नाद्रमुक प्रमुख पदानंतर तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या रुपात निवडण्यात आलंय. जयललिता यांना मिळकतीपेक्षा अवाढव्य संपत्ती बाळगल्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय आणि त्यांना चार वर्ष तुरुंगाची शिक्षाही सुनावण्यात आलीय. त्यानंतर पनीरसेल्वम मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
अन्नाद्रमुक पक्षाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आल्यानंतर काही तासांतच पनीरसेल्वम यांना तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसैय्या यांनी सरकार बनविण्यासाठी आमंत्रित केलंय.
एक चहावाला बनणार मुख्यमंत्री…
एकेकाळी चहाची टपरी चालवणारे आणि जयललिता यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे पनीरसेल्वम आता मुख्यमंत्रीपदावर आरुढ होणार आहेत.
२००१ साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत निवडून येणारे पनीरसेल्वम दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. थेवर समुदायातून आलेल्या पनीरसेल्वम यांनी जयललिता मंत्रिमंडळात अर्थ आणि लोकनिर्माण यांसारखे दोन महत्त्वपूर्ण विभाग सांभाळलेत.
जयललितांचे 'भक्त'
‘मिस्टर विश्वासू’ ही पनीरसेल्वम यांची खरी ओळख...
तांसी भूमि घोटाळ्यात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर जयललिता यांनी २००१ मध्ये पनीरसेल्वम यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलं होतं.
त्यावेळी, त्यांनी आपलं श्रद्धास्थान असणाऱ्या जयललिता यांच्या खुर्चीवर न बसता ‘उभ्या’नंच मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची भूमिका घेतली होती. जयललिता यांना त्या प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर पनीरसेल्वम यांनी पद सोडलं होतं.
सप्टेंबर लकी महिना…
सप्टेंबर २००१ मध्ये पनीरसेल्वम यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आताही २०१४ मध्ये सप्टेंबर महिन्यातच त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर बसण्याची संधी मिळालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.