नवी दिल्ली : देशातील वेगवेगळ्या बँकांत जवळपास पाच हजार करोड रुपये धूळ खात पडलेत... या पैशांचा कुणीही वाली नाही. ही माहिती मंगळवारी संसदेत दिली गेली.
बँकांनी दिलेल्या 31 डिसेंबर 2013 पर्यंतच्या आकडेवारीवरून 5,124 करोड रुपयांची रक्कम कोणत्याही दाव्याविना विविध बँकांमध्ये पडून आहे. अर्थ राज्यमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेला एका लिखित स्वरुपातील उत्तरामध्ये ही माहिती दिलीय.
‘कोणताही दावा नसलेली एकूण रक्कम (10 वर्षांहून अधिक जुनी) शेड्युल्ड व्यापारी बँकांमध्ये पडून होती. 31 डिसेंबर 2013 पर्यंत ही रक्कम 51 अरब, 24 करोड, 98 लाख, 11 हजार, 927 रुपये होती’, अशी माहिती सीतारमण यांनी दिलीय.
सीतारमण यांच्या म्हणण्यानुसार, वेळोवेळी रिझर्व बँकांनी बंद पडलेल्या खात्यांच्या संबंधित खातेधारकांविषयी माहिती मिळवण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली... पण, त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
बँकांनाही आपल्याकडील, 10 वर्षांहून जुन्या कोणत्याही दाव्याविना पडून असलेल्या खात्यांची लिस्ट जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. शिवाय वेबसाईटही नियमित अंतरानं अपडेट करण्याविषयीही सूचना दिली गेलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.