www.24taas.com , झी मीडिया, पाटणा
नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीआधी पाटणामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय आहे.
स्फोटाप्रकरणी आत्तापर्यंत १३ संशयीतांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यातल्या एकाचं नाव इम्तियाज असं असून त्यानं आपला गुन्हा कबुलही केल्याची माहिती समजतेय. आपल्याला मोहम्मद तहसीन उर्फ मोन नावाच्या व्यक्तीनं स्फोटकं दिली असल्याची माहितीही त्यानं दिलीय. मोहम्मद तहसीन हा इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासीन भटकळचा उजवा हात आहे. तहसीनवर बोधगया स्फोटाबाबतही शंका आहे.
इम्तियाजच्या घरून बॉम्ब, डिटोनेटर, बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय. शिवाय अलकायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या आयुष्यावरील पुस्तकही त्याच्याकडे सापडलं.
पाटणाच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्ब फेकून पळून जाण्याचा या दहशतवाद्यांचा मनसुबा होता. रॅलीमध्ये भीतीचं वातावरण पसरवण्याचा त्यांचा प्लान होता. दहशतवाद्यांचे तीन गट होते. प्रत्येक गटात चार ते पाच दहशतवादी होते.
सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांकडून प्रेशर कुकरमध्ये ठेवण्यात आलेलं बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं. संशयीतांची चौकशी केल्यानंतर इतर ठिकाणीही छापे टाकण्यात येत आहेत. यापूर्वी झारखंड पोलीसचे अतिरिक्त पोलीस महानिदेशक एस.एन.प्रधान म्हणाले की, पाटणा स्फोटामधील संशयीतांचा संबंध झारखंड सोबतही आहे. झारखंडमध्येही चौकशी आणि तपास सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.