www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलंच ट्विटर युद्ध रंगलंय. नरेंद्र मोदींना अहंकारी, मनोरुग्ण आणि खोटारडे म्हणत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी ट्विटर युद्धाला सुरूवात केली. भाजपामध्ये नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज या चांगल्या पंतप्रधान होतील असं दिग्विजय सिंह म्हणाले. तर यावर उत्तर देत सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींपेक्षा दिग्विजय चांगले उमेदवार असं म्हटलंय.
सुषमा स्वराज यांनी दिग्विजय सिंह यांच्या ट्विटला उत्तर देतांना म्हटलं, “मला वाटतं की दिग्विजय सिंह राहुल गांधींपेक्षा चांगले उमेदवार आहेत.” जवाहरलाल नेहरु सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले नव्हते, या मोदींच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करुन टीका केली. ते म्हणाले, “आणि भाजपाला वाटतं की भारतीय मतदारांनी अशा अहंकारोन्मादी, मनोरुग्ण, खोटारड्याला मत द्यावं”, का? भाजपला चांगला उमेदवार मिळाला नाही, सुषमा स्वराज कुठे कमी आहेत का?
हे पहिल्यांदाच घडलं नाही की दिग्विजय सिंह यांनी सुषमा स्वराज यांची स्तुती केली. याआधी मागील वर्षी दिग्विजय सिंह म्हणाले होते की, पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणं ही सुषमा स्वराज यांचा अधिकार आहे. सुषमा स्वराज त्यावर बोलल्या होत्या की, काँग्रेस नेत्यांना वाद निर्माण करण्याची सवय आहे.
जवाहरलाल नेहरु यांच्यावरील मोदींनी केलेल्या वक्तव्याबाबत दिग्विजय सिंह मोरारजी देसाई यांच्या आत्मकथेचा दाखला देत सांगितलं की त्यात लिहीलंय नेहरु आणि राजेंद्र प्रसाद मुंबईमध्ये सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. मोदींनी देशासमोर क्षमा मागायला हवी.
एकूणच काय तर मोदी-राहुलवरुन पुन्हा एकदा ट्विटर युद्ध रंगतंय. सोशल मीडियाचं महत्त्व या नेत्यांना चांगलंच पटलेलं दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.