मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांसोबत संवाद साधला. भारतीय क्रिकेट टी-२० विश्वचषकात आत्तापर्यंत मिळवलेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी संघाचं कौतुक केलं. त्याचसोबत २०१७ साली भारत 'अंडर १७' फूटबॉल विश्वचषकाचं आयोजन करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील तरुणांनी फूटबॉल या खेळाला प्रोत्साहन देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना काही सल्लेही दिले. सुट्टीच्या काळात काहीतरी नवीन कला शिकण्याचे आणि भरपूर प्रवास करण्याचा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. 'प्रवास आपल्याला बरेच काही शिकवतो. आपण जे आपल्या घरात आणि शाळेच्या वर्गात शिकू शकत नाही ते आपल्याला प्रवासात शिकायला मिळू शकते,' असे मोदी म्हणाले.
भारतातील तरुणांना प्रवास आणि आव्हानांची आवड आहे. त्यांना नवनवीन स्थळे पाहण्यात रस आहे, असं मोदी म्हणाले. पर्यटनात मोठ्या प्रमाणात व्यवसायनिर्मितीचे सामर्थ्य असल्याचं मोदींनी सांगितलं.
या भाषणात त्यांनी 'किसान सुविधा अॅप'चाही उल्लेख केला. एका क्लिकच्या आधारावर शेतकऱ्यांना या अॅपच्या माध्यमातून खते आणि बी बियाणांची माहिती मिळू शकते, तसेच त्यांना शेती तज्ज्ञांशी संवाध साधता येऊ शकतो, अशी माहिती मोदींनी दिली. प्रत्येकाने चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे शरीराची तपासणी करुन घ्यावी असा सल्ला मोदींनी दिला.
येत्या ४ एप्रिलपासून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथे सुरू होणाऱ्या निवडणुकांमुळे ही 'मन की बात' होणार की नाही याविषयी संदिग्धता होती. पण, निवडणूक आयोगाने हिरवा कंदील झाल्यावर आज ही 'मन की बात' पार पडली.