दोन पोलीस अधिकारी निलंबित दंडाधिकारी चौकशीचे आदेश
अमृतसर : पंजाबचे महसूल मंत्री बिक्रमसिंग मजिठिया यांनी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात आज राष्ट्रध्वज उलटा फडकवला. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत पंजाब सरकारने दोन पोलीस अधिकार्यांना निलंबित केले असून या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुनानक ऑडिटोरियमध्ये आयोजित स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात महसूल मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांनी राष्ट्रध्वज फडकवला. या कार्यक्रमास अमृतसरचे पोलीस आयुक्त जतिंदर सिंग अलुख आणि उपायुक्त रवी भगत उपस्थित होते. या सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामीही दिली. यानंतर मंत्री मजिठिया यांनी भाषण केले. मात्र समारंभ संपताना राष्ट्रध्वज उतरवून पुन्हा योग्य पद्धतीने फडकवण्यात आला.
या घटनेविषयी बोलताना विक्रमसिंग मजिठिया म्हणले, ध्वजारोहणाबाबत चूक कशी झाली त्याची माहिती जिल्हा प्रशासनच देऊ शकेल. दरम्यान, या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त जतिंदरसिंग अलुख यांनी दिली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत ध्वजारोहण समारंभाचे नियोजन करणार्या दोन पोलीस अधिकार्यांना तातडीने निलंबित केले तर या प्रकरणी पोलीस मुख्यालयाचे अधीक्षकांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. आज सकाळी ध्वजारोहणाची तालिम घेण्यात आली होती तेव्हा ध्वजाची स्थितीत योग्य होती. मात्र त्यानंतर ध्वज उलटा कसा झाला. यामागे कट असावा असे पोलीस आयुक्त जतिंदरसिंग अलुख म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.