www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
थोडाफार सावरतोय अशी चिन्हं दिसता-दिसताच रुपया पुन्हा एकदा धडामदिशी खाली आदळलाय. मंगळवारी शेअरबाजार आणि रुपयाच्या मूल्यासाठी अनलकी ठरलाय.
एकीकडे शेअर बाजारामध्ये सुरु असलेल्या पडझडीमुळे गुंतवणुकदारांचे धाबे दणाणलेत तर दुसरीकडे रुपयाचं मुल्यानं डॉलरच्या तुलनेत आत्तापर्यंतची सर्वात खालची पातळी गाठलीय.
मंगळवारी सेन्सेक्समध्ये ४५० अंकांची घसरण झाली तर निफ्टीमध्येही १५० अंकांची घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारासोबतच रुपयाची अवस्थाही दयनीय झालीय. सध्या एका डॉलरच्या तुलनेत तब्बल ६६ रुपये मोजावे लागत आहेत.
गेल्या आठवड्यात रुपयाच्या मूल्यात सतत पडझडच दिसून आली. हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे. रिझर्व्ह बँकेनं रुपयांचं मूल्य सावरण्यासाठी आत्तापर्यंत केलेले सर्व उपाय फोल ठरताना दिसत आहेत.
आंतरबँक परदेशी चलन विनिमय बाजार म्हणजेच फॉरेक्समध्येही सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ६४.३० पैसे दरावर बंद झाला होता. परदेशी चलन विश्लेषकांच्या मते, आयातदारांकडून महिन्याच्या शेवटी डॉलरची वाढलेली मागणी आणि ढासळलेला शेअरबाजार यामुळे रुपयांचं मूल्यं सतत घसरताना दिसतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.