www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यात शिवसेनेनं इच्छुकांचे पत्ते कट करत एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राला श्रीकांत शिंदेला उमेदवारी देत धक्का दिलाय. तर राष्ट्रवादीने गटातटाच्या राजकारणाला पूर्ण विराम देत कथोरे आणि नाईक यांचे मनोमिलन घडवून आणलं होतं.
त्यामुळं लोकसभा उमेदवार आनंद परांजपे यांच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याचं बोललं जात होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्वेचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी आंनद परांजपे यांना पाठींबा देणार नसल्याचे जाहीर केलंय. त्यामुळं राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरलीये.
शिवसेनेच्या विरोधात मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले कल्याण पूर्वेचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी राष्ट्रवादीला समर्थन दिलं होतं. मात्र आनंद परांजपे यांचा प्रचार करणार नाही असं सुतोवाच केल्यानं राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
कल्याण पूर्वेत बऱ्यापैकी जनाधार असलेल्या गायकवाड यांनी पाठींबा देण्यास नकार दिल्यानं आनंद परांजपे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, गणपत गायकवाड यांचे गैरसमज दूर करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आशिष दामले यांनी सांगितलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.