www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज मिळालाय. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लोकसभेत अन्न सुरक्षा विधेयकावर मतदान सुरू असतानाच तब्येत बिघडल्यानं मतदान न करताच त्यांनी संसदेबाहेर पडून हॉस्पीटल गाठलं होतं. यावेळी राहुल गांधी आणि कुमार शैलजा त्यांच्यासोबत होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या प्रकृती आता चिंताजनक नाही. कुमारी शैलजा यांनीही सोनिया गांधींची प्रकृती आता पूर्णत: बरी असल्याचं म्हटलंय. छातीत अचानक दुखू लागल्यानं सोनियांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रात्री उशीरा १.३० वाजल्याच्या सुमारास सोनियांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळालाय. यानंतर सोनिया गांधी घरी परतल्याचं गुलाम नबी आझाद यांनी माहिती दिलीय.
लोकसभेत अन्न सुरक्षा कायद्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी काल भाषण केलं होतं. यावेळी त्यांची प्रकृती ठिक नसल्याचं सांगण्यात येतंय. भाषण करताना मध्येच थोडा वेळ त्यांनी ब्रेकही घेतला होता. वोटींग सुरू झाली तेव्हा त्या सदनातच होत्या. परंतु, छातीत कळ आल्यानं आणि घाम फुटल्यानं त्यांना आपल्या महत्त्वकांक्षी विधेयकावर मतदान न करताच एम्स गाठलं होतं. लोकसभेतून बाहेर पडताना सोनिया गांधींचा तोल जात होता. मात्र, यावेळी बाजुलाच असलेल्या कुमारी शैलजा यांनी सोनियांना आधार दिला. सोनिया गांधी गेले दोन दिवस व्हायरल तापाने आजारी असल्याचंही सांगण्यात येत होतं.
सोनियांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता मुलगी प्रियांका गांधी, जावई रॉबर्ट वडेरा, मुलगा राहुल गांधी यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही हॉस्पीटलमध्ये उपस्थित झाले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.