श्री श्री रवीशंकर यांना दणका, ५ कोटींचा दंड

अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना चांगलाच हरित लवादाने दणका दिलाय. त्यांना ५ कोटी रुपयांना दंड ठोठावलाय.

PTI | Updated: Mar 10, 2016, 10:33 AM IST
श्री श्री रवीशंकर यांना दणका, ५ कोटींचा दंड   title=

नवी दिल्ली : अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना चांगलाच हरित लवादाने दणका दिलाय. त्यांना ५ कोटी रुपयांना दंड ठोठावलाय.

श्री श्री रवीशंकर यांच्या पुढाकाराने यमुना नदीच्या काठी होणाऱ्या आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून वादात सापडलेल्या विश्व संस्कृती महोत्सवाला राष्ट्रीय हरित लवादानं (एनजीटी) काल परवानगी दिली. मात्र, महोत्सवामुळे होणाऱ्या जलप्रदुषणाची भरपाई म्हणून त्यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन'ला तब्बल ५ कोटींचा दंडही ठोठावला. 

जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेला विश्व संस्कृती महोत्सव ११ ते १३ मार्च दरम्यान होणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या यमुना नदीकाठच्या मैदानावर हा महोत्सव होणार असल्याने पर्यावरणवादी संघटनांनी त्यास आक्षेप घेतला. त्यानंतर हरित लवादाकडं धाव घेतली होती. 

यावर सुनावणी झाली. त्यावेळी हा दंड ठोठावला. तक्रारदारांनी तक्रार करण्यास उशीर केला आहे. महोत्सवाचं काम खूप पुढं गेलं आहे. त्यामुळं आता ते थांबवणं योग्य होणार नाही, असे सांगत लवादाने महोत्सवाला परवानगी दिली. 

दरम्यान, आयोजकांना ५ कोटींचा दंड ठोठावताना दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला १ लाख, तर दिल्ली विकास प्राधिकरणालाही (डीडीए) ५ लाखांच्या दंडाचा दणका दिला. तसेच आढावा घेण्यासाठी लवादाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारे दंडाची रक्कम वाढविली जाईल, असेही लवादाने स्पष्ट केलेय.