www.24taas.com, झी मीडिया, तिरूपती
तिरूपती देवस्थानात देवाला अर्पण होणाऱ्या केसांच्या विक्रीतून तिरुमला तिरुपती देवस्थानला मागील 5 वर्षांत सुमारे 715 कोटी रुपये मिळाले आहेत.
देवस्थान समितीच्या आज झालेल्या व्यवस्थापन समिती बैठकीत ही माहिती मिळाली. दरम्यान, केस विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होतांना दिसतेय.
तिरुमला येथील बालाजीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात, दररोज सरासरी 45 ते 75 हजार भाविक येतात.
या ठिकाणी गेल्यावर केस अर्पण करण्याची पद्धत आहे. यामध्ये महिलांची संख्याही मोठी असते.
केस अर्पण करणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी देवस्थानची स्वतंत्र यंत्रणाही आहे. अर्पण केलेल्या केसांची देवस्थानच्या वतीने विक्री करण्यात येते.
परदेशांत हे केस विकले जातात. निविदा पद्धतीने त्यांची विक्री होते. केसांची 1 पासून 5 क्रमांकांपर्यंत वर्गवारी करण्यात येते.
या केसांमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रोटिन्सचे घटक असतात; तसेच केसांपासून विविध वस्तूही बनवल्या जातात. त्यामुळे या केसांना मागणी वाढत आहे.
महिलांच्या केसांना अधिक मागणी आहे. मध्यंतरी देवस्थानने महिलांनी केस अर्पण केल्यास मोफत लाडू प्रसाद देण्याचीही सोय केली होती.
अर्पण झालेल्या केसांची विक्री करून तिरुपती देवस्थानने पाच वर्षांत सुमारे 715 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
2009 मध्ये 96 कोटी असलेले उत्पन्न या वर्षी 240 कोटींपर्यंत गेले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.