www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रॉबर्ट वडेरा यांना दिलेली एनएसजी सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी खुद्द प्रियांका गांधी - वडेरा यांनीच केलीये. प्रियांका यांनी एनएसजी संचालकांना पत्र पाठवलंय.
यूपीए शासनाच्या काळात वडेरांना एनएसजी सुरक्षा देण्यात आलीय. आपल्याला तसंच आपल्या कुटुंबीयांना विमानतळावर मिळणारी सामान्य सुरक्षा चौकशीतून मिळणारी सूट काढण्यात यावी, अशी मागणी प्रियांका यांनी एसपीजीचे प्रमुख दुर्गाप्रसाद यांना पत्र पाठवून केलीय. हे काम लवकरात लवकर केलं गेलं तर आपल्यालाही बरं वाटेल, असा उल्लेखही त्यांनी या पत्रात केलाय.
‘एसपीजीचे माजी प्रमुख आणि दिल्ली पोलिसांनी जोर दिल्यानंतर वडेरा यांचा समावेश या सूचीत करण्यात आला होता. यासाठी आमच्यापैंकी कुणीही मागणी केली नव्हती... सुरक्षा प्रदान केली गेल्यानंतर आम्हाला याबाबत माहिती मिळाली’ असा उल्लेख करायलाही प्रियांका विसरल्या नाहीत.
नव्या सरकारनं रॉबर्ट वडेरांसह २५ जणांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याचं सुतोवाच केलंय. त्यामुळे राजकीय कोंडी टाळण्यासाठी प्रियांकांनी हे पाऊल उचलल्याचं मानलं जातंय. मात्र जर गरज नव्हती, तर मग इतकी वर्षं वडेरांना सुरक्षा आणि विमानतळांवरील तपासणीतून सवलत का दिली गेली, असा प्रश्न उरतोच.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.