भोपाळ : व्यापमं घोटाळ्यानंतर सुरू असलेली संशयित मृत्यूंची मालिका अजून संपत नाहीय. व्यापमं गैरव्यवहारात मध्य प्रदेशातील भाजपचे शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले आहे.
मात्र पत्रकार अक्षय सिंग याच्या मृत्यूनंतर भाजपचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकार हा मंत्र्यापेक्षा मोठा आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पत्रकार अक्षय सिंग यांच्याविषयी बोलताना विजयवर्गीय म्हणाले, की पत्रकार वगैरे सोडून द्या हो, पत्रकार आमच्यापेक्षा मोठा आहे का? यावेळी विजयवर्गीय यांच्यासोबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानही उपस्थित होते.
या वक्तव्यावरून गदारोळ झाल्यानंतर विजयवर्गीय यांनी माध्यमांनी आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचे सांगितले.
मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाची म्हणजेच 'व्यापमं'ची प्रवेशप्रक्रिया आणि भरतीप्रक्रियेतील गैरव्यवहाराचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ३० जणांचा गूढ मृत्यू झाला आहे. या गैरव्यवहाराशी संबंधित नम्रता या मृत मुलीच्या आई-वडिलांची मुलाखत घेणाऱ्या दिल्लीस्थित वृत्तवाहिनीचे पत्रकार अक्षय सिंह हे अचानक आजारी पडून शनिवारी मरण पावले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.