पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावातूनच बलात्कार- शंकराचार्य

पाश्चात्त्य जीवनशैलीमुळे देशात बलात्कारासारख्या घटना घडत असल्याचं विधान पुरीच्या शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केलं आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचं देशावर झालेलं अतिक्रमण हेच बलात्कारांमागचं कारण आहे. या पाश्चात्त्य संस्कृतीने भारतीय पारंपरिक मूल्यं संपवली आहेत, असं शंकरार्यानं म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 17, 2013, 03:50 PM IST

www.24taas.com, कोलकाता
पाश्चात्त्य जीवनशैलीमुळे देशात बलात्कारासारख्या घटना घडत असल्याचं विधान पुरीच्या शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केलं आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचं देशावर झालेलं अतिक्रमण हेच बलात्कारांमागचं कारण आहे. या पाश्चात्त्य संस्कृतीने भारतीय पारंपरिक मूल्यं संपवली आहेत, असं शंकरार्यानं म्हटलं आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात देशाची संस्कृती जपण्यास आपण समर्थ होतो. मात्र गेल्या पासष्ट वर्षांत भारतीय संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे. पाश्चात्त्य शैलीचे सिनेमे, पब, मद्यपान आणि इतर मादक पदार्थांचं सेवन या गोष्टींनी भारतीय संस्कृतीला विळखा घातला आहे. यामुळेच तरुणांची बहकू लागलेली पावलं बलात्कारासारखी कृत्य करतात. बलात्कारासारख्या घटना अचानक घडत नाहीत. त्यामागे अशी कारणं असतात.
विकासाच्या नावाखाली सभ्यता आणि संस्कारांची सीमा ओलांडली गेली, की बलात्कार होतात.यावर देशवासीयांनी विचार करायला हवा. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज भाऊ-बहीणही रस्त्यावर निर्भयपणे फिरू शकत नाहीत. आपली संस्कृती महिलांचा आदर करायला शिकवते. हे विसरून चालणार नाही.
याशिवाय पाक सैनिकांकडून भारतीय लष्करावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना शंकराचार्य म्हणाले, की शेजारी राष्ट्राची आपल्या राष्ट्रावर असे हल्ले करायची हिम्मत का व्हावी, त्यांच्या नजरेत आपल्या सरकारची आणि देशाची प्रतिमा इतकी कमकुवत का आहे, याचा विचार करायला हवा, असं शंकराचार्य म्हणाले.