आता इसिसनं केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद

अमेरिकी पत्रकारांची हत्या केल्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेनं शनिवारी ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जाहीर केला आहे. डेव्हीड हेन्स, असं या नागरिकाचं नाव असून ते २०१३मध्ये सीरियातून बेपत्ता झाले होते. 

Updated: Sep 14, 2014, 05:08 PM IST
आता इसिसनं केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद title=

लंडन: अमेरिकी पत्रकारांची हत्या केल्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेनं शनिवारी ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जाहीर केला आहे. डेव्हीड हेन्स, असं या नागरिकाचं नाव असून ते २०१३मध्ये सीरियातून बेपत्ता झाले होते. 

सीरिया आणि इराकमधील अनेक भागांवर कब्जा करणाऱ्या आयएसआयएसविरोधात अमेरिकेनं मोहीम उघडली आहे. यात अमेरिकेला ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या मोहीमेला सुरुवात झाल्यावर आयएसआयएसनं गेल्या महिनाभरात दोन अमेरिकी पत्रकारांचा शिरच्छेद केला होता. हवाई हल्ले न थांबल्यास अशाचपद्धतीनं तुमच्या नागरिकांचा शिरच्छेद करु अशी धमकीही आयएसआयएसनं दिली होती. 

शनिवारी रात्री उशीरा आयएसआयएसनं ब्रिटनचे सामाजिक कार्यकर्ते डेव्हीड हेन्स यांचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जाहीर केला आहे. दोन मिनीट ४७ सेकंदाचा हा व्हिडिओ 'अमेरिकेला साथ देणाऱ्यांसाठी एक संदेश' या नावानं प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओत शिरच्छेद करणारा दहशतवादी ब्रिटनला धमकी देताना दिसत आहे. 'अमेरिकेला नकार देण्याचं सामर्थ्य ब्रिटनमध्ये नाही. अमेरिकेला साथ देणं हे ब्रिटनच्या विनाशाला गती देणारं असून यापुढंही ब्रिटनच्या नागरिकांचा अशाच पद्धतीनं शिरच्छेद केला जाईल' असं या दहशतवाद्यानं म्हटलंय.

स्कॉटलंडमध्ये जन्मलेले ४४ वर्षीय डेव्हीड हेन्स यांचं २०१३ मध्ये सीरिया इथं अपहरण झालं होतं. हेन्स हे एजन्सी फॉर टेक्निकल को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेसाठी काम करत होते. ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरुन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या क्रूरकृत्याचा तीव्र निषेध दर्शवला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.