बिरगुंज : नेपाळच्या अधिकाऱ्यांनी "भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नका‘ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर जगभरातून मदत येत आहे, तेव्हा नेपाळच्या नागरिकांना जुने कपडे देखिल पाठवण्यात आले आहेत. यावर नेपाळमधील भूकंपातील पीडितांसाठी मदत म्हणून जुने कपडे पाठवू नयेत असे आवाहन नेपाळच्या वतीने करण्यात आले आहे.
नेपाळमध्ये २५ एप्रिल रोजी झालेल्या ७.९ रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये आतापर्यंत सात हजार पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. सरकार, स्वयंसेवी संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्रानेही पीडितांच्या मदतीसाठी धाव घेतली होती. नेपाळला बसलेल्या भूकंपाच्या मोठ्या धक्क्यानंतर भारतानेच सर्वप्रथम पीडितांना तातडीने मदत पोचविली होती.
भारताच्यावतीने पीडितांना जीवनावश्यक साहित्य घेऊन आलेल्या पहिल्याच रेल्वेमध्ये जुने कपडे असल्याचे आढळून आले आहे. ही रेल्वे बिहारच्या सीमारेषेपासून नेपाळमध्ये १० किलोमीटर अंतरावरील बिरगुंज येथे आली होती. दुसऱ्या देशातून नेपाळमध्ये येणाऱ्या वस्तूंच्या सीमेवरील तपासणीदरम्यान नेपाळच्या अधिकाऱ्यांना ही बाब आढळून आली आहे.
नेपाळच्या अधिकाऱ्यांनी "भूकंप पीडितांना ताटात उरलेले अन्न पाठवू नये‘ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "मी ही माहिती गृहमंत्रालयात कळविली आहे‘ असे नेपाळमधील भारताचे वाणिज्यदूत अंजू रंजन यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.