बंगळुरू : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे सर्व भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. मूळचे बंगळुरूचे असलेल्या एका भारतीय पाद्रीची 'इस्लामिक स्टेट' ही दहशतवादी संघटना हत्या करणार असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी म्हणजेच 'गुड फ्रायडे'च्या पवित्र दिवशी हे कृत्य करण्याची शक्यता आहे.
फादर टॉम उजहन्नालिल येमेनमधील एका चर्चमध्ये फादर आहेत. एका निवृत्त लोकांच्या वसतीगृहावर ISISने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांचे ४ मार्चला अपहरण करण्यात आले होते. एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार त्याचवेळी आयसिसने चार नन्ससह १६ जणांची हत्या केली होती.
एका महिलेने फेसबूकवर टाकलेल्या माहितीनुसार या फादरची ISISने प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळवणूक केली आहे. त्यांना नमाज अदा करण्यासही भाग पाडले गेले आहे. सध्या हे फादर कुठे आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण, तरी सर्वजण हे फादर सुखरुप राहावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.
आयसिसने औपचारिकपणे या हत्याकांडाची जबाबदारी अद्याप तरी स्वीकारलेली नाही. पण, याप्रकारच्या हत्या आयसिसने आधीही केल्याने त्यांच्याकडेच संशयाची सूई जात आहे