कराची : होय, भारताचं 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी झालं, अशी कबुलीच पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय. भारतानं केलेल्या या कारवाईत 18 जण ठार झाल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. त्यामुळे, पाकिस्तानचा खोटारडेपणा सरळ सरळ उघडा पडलाय. वृत्तसंस्था 'फर्स्ट पोस्ट'नं ही बातमी दिलीय.
मिरपूर पोलीस अधीक्षकांनी (एसपी) एका चॅनलशी बोलताना मीरपूर एसपींनी ही माहिती बोलता बोलता देऊन टाकलीय.
29 सप्टेंबर रोजी भारतानं 'सर्जिकल स्ट्राईक' केलं होतं. रात्री उशीरा 2 ते 5 वाजल्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला, असं एसपींनी मान्य केलंय.
भिम्बरमध्ये समाना, पूँछमधलं हाजिरा, निलममधला दूधनियाल, हथियान बालामधल्या कयानी या ठिकाणी हे सर्जिकल स्ट्राईक झाली. इथं त्यांच्यावर प्रतिहल्लाही करण्यात आला, असंही त्यांनी म्हटलंय.
भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर ताबडतोब पाकिस्तान आर्मीनं मृतदेह उचलून अॅम्ब्यूलन्समध्ये भरले आणि घटनास्थळावरून हलवले... आजूबाजूच्या गावात त्या मृतदेहांना पुरलं असावं, असंही त्यांनी म्हटलंय.
इतकंच नाही, तर लष्कर कॅम्प्सचा उल्लेख त्यांनी 'लॉन्च बेसेस' असा केला. पाकिस्तानी आर्मी जिहादींना प्रोत्साहन देते का? या प्रश्नावर त्यांनी 'होय... ते असं करतात...' असं उत्तर दिलंय.