www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानात लोकशाहीसाठी जनआंदोलन छेडणारे मोहम्मद ताहीर उल कादरी हे पाकिस्तानातले सूफी पंडित मानले जातात. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1951 मध्ये झाला.
सूफी तत्वज्ञानावर आधारलेल्या मिनहज-उल-कुराण या संघटनेचे ते संस्थापक आहेत. त्यांचा अनेक संस्थांनी `आंतरराष्ट्रीय शांतीदूत` म्हणून गौरववलंय. जगभरातील मुस्लिम समुदाय आणि दहशतवादावर अनेक परिसंवाद आणि व्याख्यानांमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. गेल्याच वर्षी त्यांनी भारताला भेट दिली होती. यावेळी दहशतवादाला इस्लाममध्ये स्थान नसल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. पाकिस्तानच्या राजकीय पटलावरही कादरी यांचा वावर आहे.
1989 साली त्यांनी पाकिस्तान ‘आवामी तेहरीक’ नावाचा पक्ष स्थापन केला. 89 ते 93 अशी पाच वर्षं त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय. दोन दिवसांपूर्वी कॅनडाहून परतल्यावर कादरी यांनी पाकिस्तानात लोकशाही पद्धतीनं निवडणूक व्हावी, यासाठी इस्लामाबादमध्ये प्रचंड मोर्चा काढून सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय.