जगातला `बिगेस्ट लुझर`...

सौदी अरेबियातल्या एका व्यक्तीनं आपल्या वजनात तब्बल ३२० किलोंनी घट केलीय. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतं असेल... पण ही सत्य घटना आहे. वजन कमी केल्यानंतरही या व्यक्तीचं सध्याचं वजन आहे... २९० किलो.

Updated: Feb 10, 2014, 05:34 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, सौदी अरब
सौदी अरेबियातल्या एका व्यक्तीनं आपल्या वजनात तब्बल ३२० किलोंनी घट केलीय. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतं असेल... पण ही सत्य घटना आहे. वजन कमी केल्यानंतरही या व्यक्तीचं सध्याचं वजन आहे... २९० किलो.
सौदी अरबच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, खालिद अल शायरी या व्यक्तीचं वजन चक्क ६१० किलो होते. या विशालकाय शरिरामुळे खालिद अल शायरीला काम करता येणं तर दूरच पण साधं चालता-फिरताही येत नव्हतं. डॉक्टरांनी त्याच्यावर ईलाज करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खालिदला हॉस्पिटलमध्ये न्यायचं कसं? हा प्रश्न डॉक्टरांसमोर होता.
खालिद घराबाहेर काढण्यासाठी त्याच्या घराचा दरवाजा तोडावा लागला. त्यानंतर २० वर्षांच्या खालिदला फोर्कलिफ्टच्या साहाय्यानं उचलण्यात आलं... आणि हेलिकॉप्टरमधून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलात त्याच्यावर ऑपरेशन केलं गेलं.
डॉक्टर आयद अल कहतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशननंतर खालिदची प्रकृती सुधारली आहे. आता खालिद खुर्चीतही बसू शकतोय. ऑपरेशनपूर्वी आपल्या विशालकाय शरीरामुळे खालिद ३० महिने आपल्या बेडरूममध्ये बंद होता.
सौदी अरबचे बादशाह अब्दुल्ला यांनी २०१३ मध्ये उपचारांसाठी रियाद येथील मेडिकल सिटीत नेण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार कारवाई करण्यासाठी खालिदच्या घराचा थोडा भाग तोडावा लागला. खालिदसाठी वेगळा बेड बनवण्यात आला होता.
ऑपरेशन आणि सहा महिन्यांच्या इलाजानंतर खालिदचे वजन ३२० किलोंनी कमी करण्यात आलं. गंमत म्हणजे, खालिदचं वजन कमी करण्यासाठी खालिदला नाही तर त्याच्या डॉक्टरांनाच कसरत करावी लागलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.