इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी कमर जावेद बाजवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. बाजवा 29 नोव्हेंबरला निवृत्त होणा-या राहिल शरीफ यांची जागा घेतील.
बलुचिस्तान रेजिमेंटमधून येणा-या बाजवा यांनी पाकिस्तानी लष्करात विविध पदे भूषवली आहेत. बलुच रेजिमेंटने याआधी पाकिस्तानला 3 लष्करप्रमुख दिलेत. काश्मीर आणि दहशतवादासंदर्भातल्या प्रश्नावर बाजवा यांचा मोठा अनुभव आहे असे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.
बाजवा यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहिमेअंतर्गत आफ्रिकेतील देशात काम केलं आहे. या काळात त्यांनी भारताचे माजी लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांच्यासोबतही काम केलं आहे. दहशतवादाविरोधात बाजवा यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे भारत त्यांच्या नियुक्तीकडे सकारात्मक दृष्ट्या पाहू शकतो. पाकिस्तानला भारतापेक्षा कट्टरपंथियांचा सर्वाधिक धोका असल्याचे मत त्यांनी अनेकदा नोंदवलं आहे.