www.24taas.com, झी मीडिया, काहिरा
इजिप्त पुन्हा ‘पॉईंट झिरो’वर येऊन पोहचलंय. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची हकालपट्टी करण्यात आलीय. त्यानंतर लष्कारानं मध्यस्थी करत एकप्रकारे सराकारवर वर्चस्वच मिळवलंय.
इजिप्तमधले लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले पहिलेच राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना बुधवारी रात्री उशीरा खुर्चीवरून बेदखल करण्यात आलंय. मोर्सी यांनी जनतेवर लादलेलं संविधानही बरखास्त करण्यात आलंय. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना लष्करानं नजरकैद केलंय. लष्करानं केलेल्या या मध्यस्थीमुळे जनतेकडून त्यांचं स्वागत करण्यात येतंय. तहरीर चौकात नागरिकांनी एकच जल्लोष केलाय.
लष्कराद्वारे लोकांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्सी यांनी ४८ तासांचा कालावधी दिला गेला होता. त्यानंतर लष्कराचे कमांडर अब्देल फतह अल सीसी यांनी मीडियासमोर राष्ट्राला संबोधित केलं. ‘राष्ट्रपती मोर्सी यांच्याऐवजी संविधानिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना यांच्याकडे अधिकार सोपवले गेलेत. मोर्सी यांनी लागू केलेलं संविधानही बरखास्त करण्यात आलं. लवकरच राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका नव्यानं होतील’ असं त्यांनी यावेळी म्हटलंय.
मोर्सी यांना सत्तेवरून बेदखल करण्याची मागणी करणाऱ्या देशभरातील लोकांनी लष्कराच्या मध्यस्थीचं कौतुक केलंय. तहरीर चौक नागरिकांच्या घोषणांनी निनादून गेलाय. अल सीसी यांच्या म्हणण्यानुसार, लष्कारानं मोर्सी यांनी पदच्युत करून देशाला वाचविण्याची ऐतिहासिक जबाबदारी निभावली. सशस्त्र दलाचे जनरल कमान यांनी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सातच्या सुमारास राष्ट्रपती मोर्सी यांना ते ‘आता देशाचे राष्ट्रपती राहिलेले नाहीत’ असं सांगितलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.