अल नैराब : युद्ध आणि अण्वस्त्र याच्यापेक्षा कित्येक पटीनं अमूल्य असत ते मानवी नातं आणि हेच चिरंतन सत्य सांगणा-या दृश्यांची ही बातमी आहे.
हरवलेल्या दोन निरागस भावांची भावूक करायला लावणारी ही भेट आहे. सिरियातल्या अल नैराब शहरातल्या एका रुग्णालयात या दोघांची भेट झाली आणि हमसून रडतच त्यांनी मिठी मारली. धाकटा भाऊ धुळीनं माखलेला, तर मोठा त्याचं सांत्वन करतोय. दोघांना काळ्याकुट्ट आठवणींना अश्रूंनी वाट करुन दिली.
हे तीन भाऊ होते. आतापर्यंत सिरियातल्या अल नैराब शहरातल्या एकाच घरात राहत होते. मात्र बॉम्बहल्ल्यात त्यांचं घर आणि सोबतच त्यांचं भावविश्वही उद्ध्वस्त झालं. एक जागीच मृत्यू पावला तर दुसरा हरवला. आणि अचानक रुग्णालयात त्यांची भेट झाली आणि मनाच्या वेदना अशा ओसंडून वाहिल्या.
नुकताच सिरियातल्याच पाच वर्षांच्या ओमरान दकनीशचा व्यथित करणारा फोटो प्रसिद्ध झाला होता. रक्ताने माखलेला. मलब्याच्या धूळ मातीनं भरलेला. आणि आपल्याच हातांनी आपलंच रक्त पुसणारा.
ओमरानचाही एक मोठा भाऊ होता. दहा वर्षांचा अली जो सिरियातल्या हवाई हल्ल्यात जखमी झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही दृश्यांत एक समान धागा आहे तो हा की यांचा भाऊ हवाई हल्ल्यात मारला गेला.