पंडीत यांचा '१ डॉलर' ते राजीनाम्याचा प्रवास...

सिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडित यांनी मंगळवारी सिटी ग्रुपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर ‘वार्षिक एक डॉलर’ पगार घेऊन बँकेसाठी जिवाचं रान करणाऱ्या पंडीतांनी नेमका राजीनामा का दिला?

Updated: Oct 18, 2012, 07:45 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
सिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडित यांनी मंगळवारी सिटी ग्रुपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर ‘वार्षिक एक डॉलर’ पगार घेऊन बँकेसाठी जिवाचं रान करणाऱ्या पंडीतांनी नेमका राजीनामा का दिला? यावार खल सुरू झालाय. सोमवारी जाहीर केलेल्या कंपनीच्या तिमाही आकडेवारीचा पंडित यांच्या राजीनाम्याशी संदर्भ जोडला जातोय. गेल्‍या महिन्‍यात संपलेल्‍या तिमाहीमध्‍ये कंपनीच्‍या नफ्यात 88 टक्‍के घट नोंदविण्‍यात आली होती.
विक्रम पंडित यांची २००७ साली सिटी ग्रुपचे सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. जगातल्या बलाढ्य अमेरिकन बँकेला पाच वर्ष आपल्या सेवा दिल्यानंतर सीईओ पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय पंडित यांनी घेतलाय. सोमवारी सिटीग्रुपच्या तिमाही आकडेवारीत ८८ टक्क्यांची घट दिसून आली होती. ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी पंडित यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत. यावेळी ‘कंपनी आर्थिक संकटातून बाहेर पडली असून आता दुसऱ्या कोणीतरी कार्यभार स्वीकारावा’, असं पंडित यांनी म्हटलंय.
पण, पंडित याचा सिटीग्रुपचे सीईओ बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. १९८३ साली विक्रम पंडित यांनी ‘मॉर्गन स्टॅनले’चे इन्वेस्टमेंट बँकर म्हणून जबाबदारी सांभाळली. या कंपनीशी जोडले जाणारे ते पहिले भारतीय होते. २००० साली पंडित यांची मॉर्गन स्टॅनलेच्या इन्स्टिट्य़ूशनल सिक्युरिटी आणि इन्वेस्टमेंट बँकिंग बिझनेसचे सीओओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. २० वर्षाहून अधिक काळ काम केल्यानंतर त्यांनी २००५ मध्ये मॉर्गन स्टॅनले कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी हेज फंड आणि ओल्ड लेनची सुरुवात केली. २००७ मध्ये सिटीग्रुपचे सीईओ म्हणून त्यांची निवड झाली.

सिटी बँकेला झालेल्या तोट्यातून सावरण्याची मोठी जबाबदारी पंडित यांच्यावर पडली होती. मात्र, त्यानंतर २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदी दरम्यान आणि नंतरही बँकेला तारण्याचं शिवधनुष्य त्यांनी लिलया पेललं. विशेष म्हणजे २००९ आणि २०१० या मंदीच्या वर्षात त्यांनी फक्त वार्षिक ‘एक डॉलर’ एवढाच पगार घेऊन काम केलं होतं. अखेर पंडित यांच्या प्रयत्नाना यश आलं आणि कंपनी दोन वर्षानंतर पुन्हा एकदा नफ्यात आली.