समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली गँगरेप पीडित मुलीबद्दल अनुद्गार काढले होते. यावेळी त्यांनी मुलींना उपदेशाचे डोसही पाजले होते. मात्र या त्यांच्या वक्तव्यांमुळे सूनबाई आएशा टाकीया आणि तिचं कुटुंब मात्र खजिल झालं आहे.
दिल्ली गँगरेप प्रकरणी वक्तव्य करताना अबू आझमी म्हणाले होते, ‘स्त्रियांनी परपुरुषांसोबत बाहेर पडू नये. परपुरुषांसोबत फिरायला जायची तुम्हाला गरजचं का पडते? स्त्रियांच्या परपुरुषांसोबत फिरण्यावर बंदीच घालायची आवश्यकता आहे.’ या वक्तव्यामुळे सर्वत्र अबू आझमींवर टीका झाली.
‘भारतात महिलांना प्रमाणापेक्षा जास्तच स्वातंत्र्य दिलं गेलंय. हे स्वातंत्र्य शहरांत सर्रास दिसून येतं. त्यामुळेच शहरांत बलात्काराची संख्या जास्त आहे. भारतीय संस्कृती स्त्रियांना परपुरुषांसोबत फिरण्याची परवानगी देत नाही. रात्री उशीरापर्यंत महिलांनी बाहेर फिरण्यावरही बंदी घालायला हवी. जिथं पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव कमी आहे अशा ठिकाणी बलात्काराच्या घटनांचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळेच राजस्थान आणि गुजरातमध्ये बलात्काराच्या खूप कमी तक्रारी दाखल होतात. असं विधानही अबू झमींनी केलं.
मात्र काही दिवसांतच त्यांची सून आएशा टाकियाची धाकटी बहीण नताशा आपल्या स्वीडिश बॉयफ्रेंडशी विवाहबद्ध होत आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीबद्दल आझमींनी केलेल्या वक्तव्यामुळे टाकीया कुटुंबाला खजिल व्हावं लागत आहे. भारतीय संस्कृतीचं गौरवगान करणाऱ्या आझमींच्या कुटुंबातील नताशा विदेशी नागरिकाशी विवाहबद्ध होत आहे.
अबू आझमी हिंदी सिनेमांवरदेखील घसरले होते. वाढत्या हिंसेला आणि बलात्कारांना हिंदी सिनेमेच जबाबदार आहेत. हिंदी सिनेमांतून नग्नतेला प्रोत्साहन मिळतं, असं आझमी म्हणाले होते. मात्र त्यांची सूनबाई आएशा टाकीया ही हिंदी सिनेमांमध्ये अभिनेत्री आहे. तिने काम केलेल्या वाँटेड, शादी से पहले इत्यादी अनेक सिनेमांत हिंसा आणि नग्नतेने भरलेली दृश्यं आहेत. मुलींच्या कमी कपड्यांबद्दल आणि अंगप्रदर्शनाबद्दल बोलणाऱ्या आझमींची ही सून स्वतः अनेक सिनेमांमध्ये कमी कपड्यांमध्ये वावरली आहे आणि अंगप्रदर्शनही केलं आहे. त्यामुळे आयेशा चांगलीच लज्जित झाली आहे.
मात्र, तरीही ट्विटरवर आयेशाने लिहिलं आहे, “माझे सासरे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. पण मी ज्यांचा आदर करते, त्यांच्याशी माझे विचार जुळतीलच असं नाही. माझे विचार वेगळे आहेत.”