मुंबई : आज रुपेरी पडद्यावर हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित 'बघतोस काय, मुजरा कर' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टांकसाळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा कसा आहे.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी हे घ्या जाणून.
मराठी माणसाची देवावर जेवढी श्रद्धा आहे, तेवढीत श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरही आहे. एकीकडे हजारो कोटी खर्च करुन शिवरायांचे पुतळे उभारले जातात तर दुसरीकडे महाराजांनी बांधलेल्या गड, किल्ल्यांची काळजी घेतली जाते का? त्यांच्या संवर्धनाचं काय?.. त्यांच्या डागडुजीसाठी, स्वच्छेतेसाठी आपण किती पुढाकार घेतो, असे अनेक प्रश्न 'बघतोस काय मुजरा कर' हा सिनेमा पाहिल्यावर उपस्थित होतो. नानासाहेब, पांडा शेठ आणि शिवा या तीन तरुणांभोवती फिरणारी या सिनेमाची कथा आहे.
नानासाहेब जी व्यक्तिरेखा साकारली आहे जितेंद्र जोशीनं, गावाचा सरपंच आहे. पांडा शेठ आणि शिवा हे नानाचे जिगरी दोस्त आणि शिवाजी महाराजांचे खऱे भक्त. नानासाहेबांना निवडणूक लढवून आमदार व्हायचंय, पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही, हाती तिकीट लागेना.. अखेर नानसाहेब, पांडा आणि शिवा काय युक्ती लढवतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.
जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव या दोघांच्याही वाट्याला नेहमीपेक्षा हटके भूमिका आल्यात आणि त्या त्या भूमिका त्यांनी छान पार पाडल्या आहेत. अभिनेत्री नेहा जोशीची व्यक्तिरेखा पोश्टर बॉइज या सिनेमातल्याच भूमिकेसारखीच वाटते, मात्र तरीही तिनं ती चोख पार पाडली आहे. हेमंत ढोमे यांनी सिनेमाचं दिग्दर्शक केलंय त्याचबरोबर सिनेमात एक महत्वाची व्यक्तिरेखाही साकारलीये. अभिनेता विक्रम गोखले यांची भूमिका छोटी जरी असली तरी लक्षात राहणारी आहे. त्यांचा अभिनय कमाल झालाय.
'बघतोस काय मुजरा कर' या सिनेमाची मुळ कथाच भरकटलेली वाटते. सिनेमाची सुरुवात छान झालीये. केवळ प्रबोधन करणारा सिनेमा वाटू नये म्हणून अनेक मसाला एलिमेन्ट्सही सिनेमात वापरण्यात आलेत. वेगवेगळ्या फ्लेवरची गाणी आहेत, डायलॉगबाजी आहे, ह्यूमर टच आहे, मात्र सिनेमाला देण्यात आलेली ट्रीटमेन्ट हवी तितकी दमदार वाटत नाही. सिनेमाची पटकथा भरकटलेली जाणवते.
सिनेमाचं बजट तगडं दिसतंय.. सिनेमातला काही भाग लंडनमध्ये चित्रीत झालाय. एकीकडे महाराष्ट्रीतल्या गड किल्ल्यांची दुरावस्था तर दुसरीकडे इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू.. यातला फरक प्रकर्षानं जाणवतो.
गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तूंचा सिनेमात समावेश असल्यामुळे, कुठेतरी 'बघतोस काय मुजरा कर' या सिनेमाची सिनेमेटोग्राफी आणखी छान करता आली असती हे सिनेमा पाहताना जाणवतं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि श्रेयस तळपदे सिनेमात सरप्राईज एलिमेन्ट्स म्हणून दिसतात.... तेव्हा 'बघतोस काय मुजरा कर' या सिनेमातले हे सगळे एलिमेन्ट्स पाहता, या सिनेमाला मिळतात 2.5 स्टार्स.