सिनेमा : लेकर हम दिवाना दिल
निर्माता : सैफ अली खान, दिनेश व्हिजन
दिग्दर्शक : आरिफ अली
गीतकार : अमिताभ भट्टाचार्य
संगीत : ए. आर. रहमान
कलाकार : अरमान जैन, दीक्षा सेठ, मृणाल कुलकर्णी, रोहिणी, सुदीप, जयंत
'लेकर हम दीवाना दिल' या सिनेमातून अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचा आणखी एक भाऊ अरमान जैन सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. ही एका अशा जोडप्याची लव्हस्टोरी आहे जे आपल्या कॉलेजातील मैत्रिला लग्नामध्ये बदलण्याचा निर्णय घेतात. पण, या कथेत लग्नाची व्याख्या थोडी वेगळी आहे. सिनेमा एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा जंगलात फिरत राहतो. सिनेमाचं स्क्रिप्ट यापूर्वी तुम्ही बऱ्याचदा पाहिलेल्या सिनेमांसारखंच वाटेल. ते समजण्यासाठी तुम्हाला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
काय आहे कथानक
डिनो (अरमान जैन) या नावानं हाक मारल्यावर त्याला वाईट वाटतंय. पॉकेट मनीच्या जोरावर कॉलेजमध्ये मित्रांसोबत मस्ती-मौजमध्ये आपली कॉलेज लाईफ जगणाऱ्या डिनोची करिश्मा शेट्टीशी (दीक्षा सेठ) ओळख होते... आणि लवकरच ते चांगले मित्र बनतात... आपसुकच ही मैत्री प्रेमाचं रुप घेते. करिश्मा साऊथ इंडियन तर डिनो पंजाबी.... करिश्माच्या घरच्यांना तिचं डिनोसोबत असणं अजिबात पसंद आहे. एक दिवस ती डिनोशी लग्नाचा विषय आपल्या वडिलांसमोर काढते तेव्हा ते जोरात तिच्या कानाखाली वाजवतात...
बिअर बारचा व्यवसाय करणारे करिश्माचे वडिल तिचं लग्न शेट्टी कुटुंबातच करण्यासाठी आग्रही आहेत. अशातच हे लव्हबर्ड घरातून पळून जातं. दोघंही मुंबईहून गोवा पोहचून तिथंच कोर्टात लग्न करतात. यानंतर गोवामधून पळून जाऊन डिनो नागपूरला आपल्या काकांकडे (वरुण बडोला) पोहचतो... कुटुंबीयांना त्यांची खबर लागताच हे जोडपं इथूनही पळून रायपूर पोहचतं...
पैशांची कमी असल्यानं ते एका छोट्या गावात राहण्याचा निर्णय घेतात. अशामध्येच ते एक दिवस माओवाद्यांच्या तावडीत सापडतात. पोलिसांपासून लपून-छपून हे दांतेवाडाच्या जंगालात माओवाद्यांसोबतच राहणारे डिनो-करिश्मा एक दिवस इथूनही पळून जाण्यात यशस्वी होतात... पण, एव्हाना या दोघांनी वेगवेगळे मार्ग निवडले असतात.
नवखे कलाकार
डिनोच्या भूमिकेत अरमान जैन चपखल बसलाय... पण, बॉलिवूडमधला पुढचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी प्रयत्न करावे लागतील, हे नक्की. दीक्षानं यापूर्वी साऊथच्या सात सिनेमांमध्ये काम केलंय. त्यामुळे, करिश्माच्या भूमिकेसाठी तिला जास्त कष्ट करावे लागले नाहीत... पण, तरिही तिची भूमिका म्हणावी तेवढी प्रभावी ठरलेली नाही.
कुठे कमी पडले...
दिग्दर्शक आरिफ अली आपल्या या नव्या कथेत कोणताही प्रयोग करू शकलेले नाही. स्क्रिप्टवरही फार मेहनत घेतलेली दिसत नाही. सिनेमातील खलीफा-खलीफा गाणं सध्या कुठे कुठे ऐकायला मिळतंय.
एकूण काय तर...
अरमान-दीक्षाची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. गोवा आणि मध्यप्रदेशातील काही सुंदर लोकेशन या सिनेमातून पाहायला मिळतात. कॉलेजमधील मुलांना डोक्यात ठेऊन हा सिनेमा बनवला गेलाय पण, त्यात नवं काहीही नाही... बाकी उल्लेखनीय काहीही नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.